Monday, 17 September 2012



"श्री क्षेत्र माहुली"


सातारा, मुंबईपासून  २४० कि.मी वर वसलेलं आणि दैदिप्यमान इतिहास लाभलेला शहर.

अगदी शिवाजी महाराजांपासून ते पेशावाईपर्यंत कायम प्रकाशझोतात असलेलं शहर.याच्या आसपास अनेक
देवळे आहेत जी ५०० ते ६०० वर्षांपूर्वीची आहेत. त्यात प्रामुख्यानी नाव घ्यावा लागेल असं म्हणजे
"श्री क्षेत्र माहुली"ची शंकराची देवळे. श्री क्षेत्र माहुली हे पेशव्यांच्या दरबारातले प्रसिद्ध न्यायाधीश श्री. रामशास्त्री
प्रभूण्यांच जन्मगाव. यालाच "दक्षिण काशी" असेही म्हणतात. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर वसलेली
हि दक्षिण काशी. ह्या संगमावर ३ महत्वाची देवळे आहेत, विश्वेषर, संगमेश्वर आणि रामेश्वर. संगमाच्या एका
तीरावर विश्वेश्वराचे मंदिर आहे ज्याला "क्षेत्र माहुली" म्हणतात तर दुसर्या तीरावर रामेश्वराचे मंदिर आहे त्याला "संगम माहुली" म्हणतात. रामशास्त्री प्रभुणे हे संगम माहुलीचे. विश्वेश्वराचा मंदिर हे "हेमाडपंथीय " आहे. ह्या मंदिराचे आवार सप्तकोनी आहे. हे जरा वेगळेच आहे. साधारणपणे, मंदिरांची आवार हि षटकोनी किंवा अष्टकोनी असतात. ह्या साप्तकोनांमधील ६ बाजू सारख्या आहेत आणि सातवी बाजू हि वेगळी आहे. सातव्या बाजूला मंदिरात जाण्यासाठी २ बाजूनी पायऱ्या आहेत आणि दोन्हीच्यामध्ये उंच अशी दीपमाळ आहे. हि दिपमाळ साधारणपणे ५५-६० फुट उंचीची आहे आणि शिवरात्रीच्या वेळी आणि इतर काही सणांना दिवे लावले जातात.








मंदिराच्या समोरच्या बाजूला नदीकिनारी भोसले आणि पेशव्याच्या पैकी अनेक जणांच्या समाध्या आहेत त्यापैकी २ किंवा ३ दिसतात,  नदीचे पाणी  कमी असेल तर. गावातून मंदिराकडे जात असता डाव्या बाजूला अनेक समाध्या दिसतात. पण त्या कोणाच्या आहेत हे त्यावर नमूद केलेला नाही. ह्या समाध्यांच्या मागे एक खुप मोठं पिंपळाचा झाड आहे ज्यावर भरपूर वटवाघाळे दिसतात. आपण क्षेत्र माहुली मंदिराकडे जात असताना डावीकडे एक खूप मोठा दगडाचा स्थंभ आहे ज्याला एक भरभक्कम साखळदंड आहे. अशाच पद्धतीनी रामेश्वर मंदिराच्या काठावर पण अश्याच एका साखळदंडाचे अवशेष दिसतात. पूर्वीच्या काळी ह्या साखळदंडाचा वापर करून होडीनी नदीतून वाहतूक होत असे.





तसेच पुढे गेलं कि  विश्वेश्वराच्या मंदिराच्या पायरया लागतात. साधारण ९-१० पायरया चढून गेलो कि समोर
नंदी दिसतोपायऱ्या चढून वर गेल्यावर पहिल्यांदा नंदीचे देऊळ आहे. खूप सुंदर पद्धतीनी बांधलेलं आहे हे
मंदिर. नंदीचे इतका मोठं मंदिर पाहायला मिळत नाही सहसा. या मंदिरावरील कोरीवकाम पण खूप सुंदर आहे. अगदी बारीक-सारीक गोष्टी पण मेहनितिनी कोरलेल्या दिसतात इथे. नंदीचे दर्शन घेऊन मग विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला. ३-४ पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य गाभार्यात प्रवेश करायला लागतो.



नंदीचे दर्शन घेऊन विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये शिरल्यावर खूप शांत वाटतं. मंदिराच्या सभामंडपात एकदम शांत आणि गार वाटतं. खूप सुखद अनुभव होता तो. सभामंडपातील खांब तसे खूप जवळजवळ आहेत त्यामुळे मंदिर जरा छोटे वाटते. गाभार्यात तर एकदम काळोख आहे, जसा अनेक शंकराच्या मंदिरात असतो तसा. शंकराची पिंड खूपच सुंदर आहे. गाभार्यात शिरताना जी घंटा आहे ती चिमाजीअप्पानि पोर्तुगीसंविरुद्ध झालेल्या वसईच्या लढाईच्या वेळी तिथून आणलेली आहे. भलतीच वजनदार दिसते. तशी नेहमीच्यापेक्षा जरा उंचावर लावलेली आहे हि.  मंदिराच्या ३ बाजूनी गाभार्यात यायला पायऱ्या आहेत. तीनही वाट एकत्र येतात तिथे एक दगडातले कासव आहे, शंकराच्या मूर्तीकडे लक्ष ठेऊन. विश्वेश्वराचे गाभाराय्त जाऊन  दर्शन घेऊन त्या सभामंडपात  जरा वेळ शांतपणे बसून घालवला. खूप प्रसन्न वाटलं.






विश्वेश्वराच्या मंदिरासमोर नदीकाठी तशी खूप अस्वच्छता आहे. आपल्याकडे असं म्हंटला जातं कि शंकराचं वास्तव्य हे स्मशानाजवळ असतं. त्याप्रमाणे इथे एक बांधलेला स्मशान आहे, नदीच्या किनार्यावर. तिथे एक घाट आहे ज्याला "औसाहेबांचा" घाट असं म्हणतात. तिथे नदीला लागून एक शंकराचा छोटं मंदिर आहे. असं सांगतात कि मंदिर  "जीजौसाहेबांनी" बांधलेलं आहे. विश्वेश्वराच्या मंदिराच्या आवारात मंदिराच्या एका बाजूला काही जागा बांधलेल्या आहेत जिथे मरणोत्तर विधी होतात. तिथे असलेल्या गुरुजी/पुजारी यांना विचारला असत त्यांनी सांगितला कि इथे फक्त मरणोत्तर विधीच नाही तर इतर पण विधी होतात जसे कालसर्पयोग, आश्लेषानक्षत्र शांत वगैरे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असं होता कि इथे चांगले विधी पण होतात. आजूबाजूला सगळे दशक्रिया वगैरे विधी चालू असलेले पाहून मन जरा विष्णना झाला होतं.  मंदिराच्या आवाराबाहेर सगळीकडे विधी झाल्यानंतर सगळं तसाच टाकलेलं होता आणि त्यामुळे नदी फारच घाण होती. अशी  ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आपल्याकडे नीट ठेवत नाहीत याचा खूप दुखः होता. बाहेरच्या देशात अश्या वास्तू ते खूप जपतात, खूप सारी स्वच्छता असते. जे आपल्याकडे सहज शक्य आहे. आपल्याकडे तसा विचारच कोणी करत नाही असं वाटतं.

पण, एक नक्की कि मंदिराकाठची अस्वच्छता नसेल तर मंदिराच्या आसपासचा परिसर खूप छान आहे.

विश्वेश्वराच्या मंदिराकडून रामेश्वराच्या मंदिराकडे जात असता रस्त्याच्या उजवीकडे "दफनभूमी  " दिसली.
साधारणपणे हिंदू लोकांच्या स्मशानात अश्या पद्धतीचे काही पाहायला मिळत नाही. ग्रामस्थांना विचारला ह्या
बाबतीत तेव्हा असं कळले कि हि "दफनभूमी" लिंगायत लोकांची आहे. लिंगायत लोकांमध्ये एखादी व्यक्ती मरण पावली कि त्या व्यक्तीला "खुर्चीवर" बसवायची पद्धत आहे. त्यांच्या जळत नाहीत तर तसाच खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत "पुरतात". हि पण ज्ञानात  भरच होती.

विश्वेश्वराच्या मंदिराकडून रामेश्वराच्या मंदिराकडे जायला एक पूल ओलांडावा लागतो. ब्रिटीशांच्या काळातला आहे  तो, पण एकदम पक्का आहे. साधारण ८० वर्ष झाली असतील त्याला.






विश्वेश्वराच्या मंदिराच्या बरोब्बर समोर नदीच्या पैलतीरावर रामेश्वराचे मंदिर आहे. त्याची बांधकामाची शैली वेगळी आहे. हे मंदिर विश्वेश्वराच्या मंदिरापेक्षा खपाच उंचावर आहे. तिथे जायला विश्वेश्वराच्या मंदिरातून बाहेर मुख्य रस्त्यावर जाऊन कृष्णेवरचा पूल ओलांडून पलीकडे जाऊन संगममहुलीत जायला लागता आणि गावामधून आत परत कृष्णेच्या तीरावर जाऊन रामेश्वर मंदिराकडे जाता येत.  मुख्य मंदिराकडून घाटावर जाण्यासाठी ६०-६५ पायऱ्या उतराव्या लागतात. या तीरावरून विश्वेश्वराचे मंदिर खूपच छान दिसत कारण आपण उंचावर असतो. रामेश्वर मंदिर त्यामानानी जरा लहान आहे.


मुख्य मंदिरासमोरील नंदीची मूर्ती अप्रतिम आहे. त्यावरील केललं कोरीवकाम फारच सुंदर आहे. अगदी, नखांपासून ते डोळ्यापर्यंत इतका रेखीव काम केललं आहे कि वाटतच नाही हि मूर्ती "दगडात" केलेली आहे. इथल्या नंदीच्या मूर्तीची एक खासियत आहे. साधारणपणे, नंदी शंकराकडे पाहत असतो. इथे नंदी उजवीकडे पाहतोय. त्या बद्दलची "आख्यायिका" अशी आहे कि या नंदीची "शिंगे" सोन्याची होती. एकदा काही चोरांनी ती कापली आणि पळून गेले. ते "ज्या" बाजूला पळाले त्या बाजूला नंदी पाहायला लागला ज्यामुळे गावकर्यांना दुसर्यादिवशी कळले कि चोर  कोणत्या बाजूला गेले आहेत ते. गम्मतशीरच आहे. इथल्या नंदीची मूर्ती खूपच लोभसवाणी आहे. रामेश्वर मंदिराचा सभामंडप फारच लहान आहे, किंबहुना नाहीये म्हंटला तरी चालेल आणि गाभारा विश्वेश्वर मंदिरापेक्षा खूपच अंधारलेला आहे. इथली शंकराची पिंडी पण खूप छान आहे. गाभार्यात पिंडीभोवती पाणी असतं/होतं. मंदिराच्या आतील स्वछ्तातेच्या बाबतीत विश्वेश्वराचे मंदिर जास्त चांगला आहे. रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम चालू आहे.  हे संपूर्ण मंदिर काळ्यादगडातला आहे. त्यामुळे त्याला एक "भव्यता" येते.



अश्या सुंदर वास्तूला "रंगवून" टाकावं असं मला वाटत नाही.  ते डोळ्याला आणि मनाला पण खटकतं. इथल्या
ग्रामस्थानशी   बोलताना असं कळलं कि जेव्हा खूप पाउस असतो त्यावेळी घाटाच्या २५ पायऱ्या पाण्याखाली जातात. त्यावेळी जाणवलं कि नदी किती फुगत असेल पावसात.या दोन महत्वाच्या मंदिरांच्या व्यतिरिक्त इथे अजून हि काही मंदीर आहेत.




त्यातल्या काही मंदिरांकडे जाता आले नाही. त्यामुळे दुरूनच ती पाहायला लागली. रामेश्वराच्या मंदिरा समोर, घाटाच्या बाजूला २ दिपमाळा आहेत. त्यातली एक संपूर्णपणे तुटलेली आहे. पण, दुसर्या दीपमाळेवर दिवे लावले जातात जसे विश्वेश्वराच्या मंदिरात लावले जातात तसे.

 एकंदरीत, हि मंदिरांची सफर अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर झाली. माहिती पण खूप मिळाली. नशिबानी पाऊस नसल्याकारणांनी फोटो पण चांगले  काढता आले.

अजूनही अशी बरीच सारी मंदिरे आहेत जिथे जाऊन तेथील माहिती आणि फोटो काढून इतरांना माहिती मिळावी ह्या उद्देशांनी केलेला हा एक खटाटोप.